बालसंशोधक सांगली प्रकल्प

३ एप्रिल २०१५. सारे जग ‘गुड फ्रायडे’ साजरा करीत होते. ज्ञानदीपच्या कारकिर्दीतही या दिवशी एक सुखद चमत्कार घडला. पुण्यातील पर्सिस्टन्स सिस्टीम्स या नामांकित आय़. टी. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट डॉ. अभय जेरे यांनी ज्ञानदीप ऑफिसला भेट दिली.

कारणही तसेच नाविन्यपूर्ण होते. सांगली जिल्ह्यातील बालसंशोधकांचा शोध घेण्याचा एक प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी करणे हा त्यांचा या भेटीमागे उद्देश होता. पूर्वी विलिंग्डन कॉलेजमध्ये व आता पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये भौतिक शास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रा. एस. जी कुलकर्णी यांनी या बाबतीत पुढाकार घेतला होता. सांगलीत मराठी विज्ञान प्रबोधिनीचे कार्य त्यांना ठाऊक होते. या संस्थेचे कार्यवाह व आमच्या ज्ञानदीप फौंडेशनचे कार्यकर्ते श्री. अरविंद यादव, विलिंग्डन कॉलेजचे डॉ. उदय नाईक यांच्याबरोबर डॉ. अभय जेरे आमच्या घरी आले. राष्ट्रीय स्तरावर विज्ञानसंशोधनाच्या क्षेत्रात भारत सरकार करीत असलेल्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी असणार्‍या डॉ. जेरे यांनी या प्रकल्पामागची पार्श्वभूमी सांगितली.

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांमधील विज्ञान जिज्ञासा वाढावी तसेच नाविन्यपूर्ण संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांच्या कार्यास प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने २०१३ साली गोव्यामध्ये पर्सिस्टन्स सिस्टीम्सने असा प्रकल्प पूर्ण केला होता व नवसंशोधक शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेल्या निवडक प्रतिकृतींचे प्रदर्शन पुण्यात भरविले. यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. हे प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो विद्यार्थी आले. हा अनुभव उत्साहवर्धक होता.

महाराष्ट्रातही असा प्रकल्प राबविण्याची कल्पना यातून जन्मास आली. अर्थात गोव्याच्या मानाने महाराष्ट्राचे आकारमान व लोकसंख्या अतिशय मोठी असल्याने सर्व जिल्ह्यातील सर्व शाळांपर्यंत पोचून तेथील बालसंशोधकांचा शोध घेण्यासाठी मोठी प्रसार यंत्रणा व कार्यपद्धती विकसित करण्याची गरज आहे. त्याची पूर्व तयारी म्हणून सांगली जिल्ह्यासाठी पथदर्शक प्रकल्प डिसेंबर २०१५ पर्यंत पूर्ण करण्याचे पर्सिस्टन्स सिस्टीम्सने ठरविले. विज्ञानभारती या संस्थेच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे.

सांगलीत विज्ञानप्रसाराचे कार्य मराठी विज्ञान प्रबोधिनी ही संस्था १९८१ पासून करीत आहे. विविध क्षेत्रातील विज्ञान तज्ज्ञ, वैद्यकीय व इंजिनिअरिंग व्यवसायातील अधिकारी व्यक्ती तसेच शाळांतील विज्ञान शिक्षक यांच्या एकत्रित प्रयत्नातून या कार्यास चांगली गती आली आहे. गेल्या वर्षी श्री अरविंद यादव यांचा उत्कृष्ट विज्ञान प्रसारक म्हणून मराठी विज्ञान परिषदेमार्फत गौरव करण्यात आला. साहजिकच या संस्थेचे सहकार्य घेतल्यास प्रकल्प यशस्वी होण्यास मदत होईल.

मराठी विज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान प्रसाराच्या कार्यास मदत म्हणून ज्ञानदीप फौंडेशनने २००५ मध्ये विज्ञानविषयक वेबसाईट (www.vidnyan.net) कार्यान्वित केली. मिरज विद्यामंदिर या शाळेतील ज्येष्ठ विज्ञानशिक्षक श्री. गो. पां. कंटक यांचे हस्ते या वेबसाईटचे उद्‌घाटन करण्यात आले.

मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी तसेच सर्वसामान्य मराठी जनतेस जगातील विज्ञान संशोधनाची ओळख व्हावी तसेच मुलांमध्ये विज्ञान जिज्ञासा वाढावी या हेतूने अनेक लेख , विज्ञान प्रयोग व चलचित्रे यांचा समावेश या वेबसाईटवर करण्यात आला आहे. वेबसाईटबरोबरच सध्याचे आधुनिक माध्यम मोबाईल यावर पाहता येणारी विज्ञानविषयक अँड्रॉईड ऎपही ज्ञानदीपने विकसित केली आहेत.

पर्सिस्टन्स सिस्टीम्सच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात ज्ञानदीप फौंडेशन आपले सक्रीय योगदान देणार आहे.

त्यादिवशी दुपारी डॉ. जेरे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांची सभा घेतली व या प्रकल्पाची रूपरेषा सांगितली. सांगली जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना या प्रकल्पाची माहिती देणे, त्यांना संशोधनासाठी योग्य ते मार्गदर्शन करणे यासाठी अनेक विज्ञानप्रेमी स्वयंसेवकांचे सहकार्य लागणार आहे असे आवर्जून सांगितलॆ.

प्रकल्पाच्या सुयोग्य कार्यवाहीसाठी www.i4c.co.in ही वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. त्यावर इच्छुक विज्ञानप्रेमी स्वयंसेवकांनी आपली नावे नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

बालसंशोधकांचा शोध ही कल्पनाच नाविन्यपूर्ण आहे. मी इंटरनेटवर याचा शोध घेतला तेव्हा मला कळले की भारत सरकारतर्फे माजी राष्ट्रपती व जागतिक संशोधक डॉ. अब्दुल कलाम आझाद यांच्या पुढाकाराने ‘इग्नाईट अवार्ड’ या नावाने असे कार्य २००८ पासून चालू आहे. अमेरिकेतही अशा स्पर्धा गेली अनेक वर्षे घेतल्या जातात.

यासंबंधीची सर्व माहिती तसेच त्यांनी प्रसिद्ध केलेली पुस्तके विज्ञान डॉट नेट या वेबसाईटवर ‘बालसंशोधक’ या विभागात देऊन ज्ञानदीपने आपले या प्रकल्पातील सहकार्य सुरू केले आहे.

मला वाटते की बालसंशोधकांचा शोध घेण्यापेक्षा बालसंशोधक निर्माण कसे होतील यासाठी प्रयत्न व्हावयास हवेत. परदेशात ‘चेरी पिकींग’ या कार्यक्रमात अनेक लोक उत्साहाने सहभागी होतात. चेरीची बाग फुलविणार्‍या शेतकर्‍याला मात्र सर्व जण विसरतात. तसेच काहीसे येथे होताना दिसते. बालसंशोधकांना शोधून बक्षिसे देणे आवश्यक आहेच मात्र त्यापेक्षाही जास्त महत्वाचे म्हणजे मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती व जिज्ञासा कशी वाढेल यासाठी प्रयत्न करण्याची, त्यांना आवश्यक ती सर्व साधनसामुग्री पुरविणे व जिज्ञासापूर्तीसाठी लागणारी ज्ञानसंपदा त्यांना सहजी उपलब्ध करून देण्याची खरी गरज आहे. यासाठी पैसेच लागतात असे नाही तर प्रौढांनी आपला वेळ मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी व मुलांसाठी सोपे वैज्ञानिक साहित्य निर्माण करण्यासाठी पुरेसा वेळ काढावयास हवा.
Hits: 73