जागतिक खगोलशास्त्रज्ञ

आधुनिक विज्ञान म्हटले की, त्यासाठी आपण पाश्चात्य देशांकडे बघत असतो. आज जगाने जी काय भौतिक व तांत्रिक प्रगती केली आहे त्याचा पाया थोड्याफार का प्रमाणात असेना तो पाश्चात्य विज्ञान व तंत्रज्ञानीच घातला आहे, हे खरे.

आता हेच बघा ना की गॅलेलिओच्या केवळ 1 इंच व्यासाच्या दुर्बिणीने जगाला आधुनिक खगोलशास्त्राची ओळख करून दिली. यानंतर तर जगात मोठमोठ्या दुर्बिणी तयार झाल्या व होत आहेत आणि परमेश्वराने निर्माण केलेल्या या अनंत सृष्टीचा वेध घेत आहोत. जगात आतापर्यंत होऊन गेलेल्या व असलेल्या प्रमुख खगोल शास्त्रज्ञांचा परिचय नागपूर येथील सुप्रसिद्ध नचिकेत प्रकाशनने प्रसिद्ध केलेल्या ङ्कजागतिक खगोलशास्त्रज्ञङ्ख या पुस्तकातून आपणास होतो. लेखक प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी थोडक्यात परंतु अतिशय महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकाद्वारे देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

पुस्तकाची प्रारंभीची 13 प्रकरणे ही भारतीय खगोलशास्त्रज्ञांची माहिती देणारी आहेत.आपण खगोलशास्त्रासाठी पाश्चात्यांकडे बघतो. परंतु हजारो वर्षे आधी भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी किती प्रचंड प्रगती साधली होती याची माहिती या 13 प्रकरणातून कळते. प्राचीन काळातील भारतीय वैज्ञानिक कणादमुनी, आर्यभट्ट, जीवक, सुश्रूत, वराहमिहीर, पाराशर, सिद्ध नागार्जुन, काश्यप, अगस्ती भारद्वाज, भास्कराचार्य व बौद्धायन आदी ऋषिमुनींनी केलेल्या संशोधनाची माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आपल्यालाही आपल्या संस्कृतीचा व शास्त्रज्ञांचा अभिमान वाटू लागेल. अशी माहिती अशा पुस्तकांच्या माध्यमातून उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीनेच नचिकेत प्रकाशनने ङ्कविज्ञान यज्ञङ्ख या मालिकेद्वारे विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राविषयी ज्ञान देणारी पुस्तके वाचकांना देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

ङ्कजागतिक खगोलशास्त्रज्ञङ्ख या पुस्तकांच्या पहिल्या 13 प्रकरणात प्रा. माणिकपुरे यांनी प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैज्ञानिक ब्रम्हगुप्त खगोल वैज्ञानिक, वराहमिहीर, भौतिक शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर व्यंकट रामन, चंद्रशेखर सुब्रम्हण्यम, विक्रम साराभाई, डॉ. होमी भाभा, डॉ. राजा रामण्णा, हरिशचंद्र, डॉ. सतीश धवन, अंतरिक्ष यात्री राकेश शर्मा, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची माहिती दिली आहे.

14 व्या प्रकरणापासून प्रा. माणिकपुरे यांनी टायको ब्राहे या पाश्चात्य खगोलशास्त्रज्ञापासून ते शेवटी ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग पर्यंतच्या शास्त्रज्ञांचा कार्य कर्तृत्वासह परिचय करून दिला आहे.

एकूणच काय तर एकंदर 39 शास्त्रज्ञांचा परिचय 128 पानांमधे अतिशय मोजक्या परंतु वाचनीय शब्दांत प्रा. माणिकपुरे यांनी करून दिले आहे. शाळांनी हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावे असे आहे. नचिकेत प्रकाशनने एक चांगले पुस्तक प्रकाशित केले आहे.

विलास कुळकर्णी

Hits: 53