वैज्ञानिक शिल्पकार डॉ. होमी भाभा
नागपूरस्थित नचिकेत प्रकाशनने "विज्ञान यज्ञ" या मालिकेंतर्गत "वैज्ञानिक शिल्पकार डॉ. होमी भाभा" हे लेखक श्रीजयंत एरंडे यांचे पुस्तक प्रकाशित करून मराठी साहित्यात एक चांगली भर टाकली आहे.
100 रूपये किंमत असलेल्या या पुस्तकात जयंत एरंडे यांनी डॉ. होमी भाभांच्या संदर्भात जी माहिती दिली आहे ती एकूण नऊ प्रकरणांच्या माध्यमातून दिली आहे.
डॉ. होमी भाभा यांचा जन्म 30.10.1909 रोजी मुंबई येथे झाला. 1932 साली बी.ए. तर 34 साली त्यांनी पीएच.डी. संपादन केली. 1940 मध्ये बंगलोर येथील भारतीय विज्ञान संस्थेत रीडर म्हणून ते लागले. 45 साली टाटा मूलभूत संशोधन केंद्र मुंबईचे संस्थापक संचालक, 48 मध्ये हॉपकिन्स पारितोषिक (लोकसभेत अणुशक्ती कायदा संमत) भारत अणुशक्ती विभागाचे सचिव, 53 मध्ये ट्रॉम्बे (तुर्भे) येथे थोरियम प्रकल्पावर काम सुरू, 1955 मध्ये अप्सरा अणुभट्टी बांधण्याचा निर्णय भारत कनडात करार, 58 तारापूर केंद्र बांधण्याचा निर्णय 62 राजस्थानात वीजकेंद्र स्थापन्याचा निर्णय 63 मध्ये थुंबा येथून रॉकेटचे उड्डाण, 64 थुंबा येथून सहा रॉकेटसचे उड्डाण आणि 24.1.1966 रोजी माऊंट ब्लॉक येथे विमान अपघातात वयाच्या अवघ्या 57 व्या वर्षी निधन.
हा झाला डॉ. होमी भाभांच्या जीवनाचा अत्यंत संक्षिप्त असा आढावा. या काळात त्यांना कितीतरी विद्यापीठांच्या सन्माननीय डॉक्टरेट मिळाल्या. अनेकानेक देशी-विदेशी संस्थांवर त्यांची नेमणूक झाली. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी केली.
भारताने आज वैज्ञानिक अवकाश क्षेत्रात जी प्रगती केली आहे, त्याचा पाया डॉ. होमी भाभा यांनी टाकला आहे. अर्थातच तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांची त्यांना वेळोवेळी मिळालेली साथही तेवढीच महत्वपूर्ण म्हणावी लागेल. दोघांची चांगली मैत्री. भाभांनी सुचविलेल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी नेहरूंनी वेळप्रसंगी सरकारी नियम बाजूला सारले. कारण त्यांचा भाभांच्या कार्यावर असलेला विश्वास.
57 साली रशियाने अंतराळात स्फुटनिक उपग्रह पाठविल्यानंतर चार वर्षातच डॉ. भाभांनी भारतीय अवकाश संशोधनाच्या दिशेने कार्य प्रारंभ केले. आज आपण भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे जे अवाढव्य काम बघत आहोत. त्यामागे डॉ. होमी भाभांची प्रेरणा होती. त्यांनी त्याच वेळी अवकाश संशोधनाचे महत्व ओळखले होते. यासाठी संस्था स्थापन करून तेथील शास्त्रज्ञांना व कर्मचाऱ्यांना ते सतत प्रोत्साहन देत राहिले. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या इतर तरुण शास्त्रज्ञांनीच आज भारताला अवकाश, क्षेपणास्त्र, अण्वस्त्र व इतर वैज्ञानिक क्षेत्रात वरच्या पंक्तीत आणून ठेवले आहे. डॉ. भाभांच्या कार्याची केवळ देशपातळीवरच नाही तर जागतिक पातळीवरच्या वैज्ञानिकांनी वेळोवेळी दखल घेतली आहे. त्याचेच एक प्रतिक म्हणून चंद्रावरचा दुसऱ्या बाजूच्या एका जागेला भाभांचे नाव दिले आहे.
भाभांना वैज्ञानिकांची पारख होती. ते त्यांना विदेशात उच्च शिक्षणासाठी पाठवीत. एकदोन अपवाद वगळता त्यांनी विदेशात पाठविलेले वैज्ञानिक पदवी प्राप्त करून परत भारतात आले आणि वेगवेगळ्या संस्थांत देशासाठी कार्य करू लागले.
डॉ. भाभा हे सौंदर्यपूजक होते. चित्रकार होते, स्वत:च्या शरीराबरोबरच आपल्या संस्थेच्या आरोग्याचीही काळजी कशी घ्यावी यावर ते स्वत: भर देते व दुसऱ्यांना तरी करावयास लावत. ट्रॉम्बेची अणुभट्टी हे त्याचे एक चांगले उदाहरण म्हणता येईल. ते पर्यावरणप्रेमी होते, तसेच संगीतप्रेमीही.
भाभांनी जीवनावर प्रेम केले, माणसे व संस्था घडवल्या. भारताला विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात सक्षम करण्यासाठी दिशा दाखविली. अनेकानेक व्यक्तींनी भाभांचा कार्याची तोंड भरून स्तुती केलेली आहे, ती काही उगाच नाही.
नचिकेत प्रकाशनने लेखक जयंत एरंडे यांचे हे पुस्तक प्रकाशित करून सर्वसामान्यांना डॉ. होमी भाभांबद्दल जी सचित्र माहिती उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल त्यांचे आभारच मानावे लागतील.
विलास कुळकर्णी
डॉ. होमी भाभा
लेखक : श्री. जयंत एरंडे
पृष्ठ संख्या : 96, किंमत : 100 रू.
नचिकेत प्रकाशन
9225210130