सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
लेखक - एस. एस. क्षत्रिय
विकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि.
आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली.
मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये नुकताच जाऊन आलो होतो. तेथील वैभव पाहून माझे डॊळे दिपून गेले होते. सिलिकॉन व्हॅलीला हे वैभव मिळवून दॆण्यात भारतीयांचा महत्वाचा वाटा आहे हे ऎकल्याने मी मनोमन सुखावलो होतो. टेक म्युझियममध्ये ‘सुहास पाटील’ हे नाव कोरलेले पाहिल्यावर माझी छाती अभिमानाने भरून आली होती. आय. टी. उद्योगाची पंढरी असणार्या स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीला भेट दिल्यावर तर मी भक्तीभावाने तेथील दगडगोटे सिलिकॉन चिप मानून घरी घेऊन आलो होतो. भारतात परतल्यानंतर आमच्या ज्ञानदीपच्या भावी संगणक तज्ञांना त्यातील एक एक दगड देऊन तो देवात ठेवण्यास सांगितले होते व तुम्ही सर्वांनी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन यश मिळवायची खूणगाठ बांधा असे सुचविले होते. साहजिकच ‘सिलिकॉन व्हॅली’ हे नाव वाचताच मी ते पुस्तक विकत घेतले.
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन ओसे पर्यंतच्या दहा मैल रुंदीच्या व ३० मैल लांबीचा प्रदेशास ‘सिलिकॉन व्हॅली’ असे म्हणतात. तेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या गतीने प्रगती झाली व नव्या कंपन्या उदयास आल्या, त्याचीच पुनरावृत्ती भारतात बंगलोरमध्ये पहावयास मिळाली. त्यामुळे लेखकाने बंगलोरला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सिलिकॉन व्हॅली व बंगलोरविषयी माहिती व भारतीयांच्या सिलिकॉन व्हॅलीमधील वास्तव्य व टेक्नॉलॉजीमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे व मुख्य भागात नऊ उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे. त्याचा थोडक्यात सारांश.
१. चंद्रशेखर - चैन्नईजवळच्या कुंभकोरम या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात १९६० मध्ये कि. बा. चंद्रशेखर यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगच्या प्रवेशपरिक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी बीएससीत प्रवेश घेतला. विद्यापिठात तिसरा क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवली व मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा मिळविला. सात वर्षे विप्रोत नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये अमेरिकेतील रोल्टा कंपनी जॉईन केली. १९९२ मध्ये आपल्या घरातच स्वतःची फोरेस नावाची कंपनी काढली. त्यांची पत्नी सुकन्या हिने त्यात मदत केली. पुढे याच कंपनीचे एक्झोडस हे नामांतर झाले. अमेरिकेतील प्रोजेक्ट मिळवून भारतातील त्यांच्या मित्रांनी बंगलोरमध्ये स्थापन केलेल्या कंपनीमार्फत काम करुन घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवला. ऎक्झोडस ही कंपनी १९९८ मध्ये पब्लिक लिमिटेड झाली. टीआयई या भारतातील आय टी उद्योजकांना मदत करणार्या संस्थेचे कंवल रेखी यांनी २००,००० डॉलरची मदत केली. यातूनच जॅमक्रॅकर या सॉफ्टवेअर कंपनीची इ. स. २००० मध्ये स्थापना केली व त्यासाठी १०० दशलक्ष डॉलरचे भांडवल मिळविले. नंतर त्यांनी e4e नावाची नव्या उद्योगांना भांडवल पुरविणारी कंपनी स्थापन केली.
२. बी. व्ही जगदीश - जगदीश यांनी १९७८ मध्य् बी. ई. इलेक्ट्रिकल व १९८० मध्ये व्हीजेटीआयमधून एमटेक केले व महिना १२०० रु. ची नोकरी पत्करली. दोन मुलांसह आठ बाय आठ फुटांच्या एका खोलीत त्यांनी दोन वर्षे संसार केला. टाटा एलेक्सी व नंतर सिंगापूर मध्ये नोव्हेल कंपनीत त्यांनी नोकरी केली. अमेरिकेतील कंपन्यांशी संपर्क वाढवून व चंद्रशेखरांच्या एक्झोडसमध्ये जॉईन होऊन त्यांनी आपल्या उद्योगाचा जम बसविला. नेटमॅजिक, नेट स्केलर या डाटा सेंटर कंपन्या तसेच आयस्टेशन नावाची मेल सर्व्हीस देणारी कंपनी काढली.
३. कंवल रेखी - स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी रावळपिंडी येथे जन्म झालेले कंवल रेखी कानपुरात विस्थापित म्हणून रहायला आले. १९६३ मध्ये बीएससी व आय. आय टी, मुंबईला १९६८ मध्ये बी टेक. करून मिशिगन युनिव्हर्सिटीत एमएस केले. १९७० मध्ये आर.सी.ए कंपनीत नोकरी सुरू केली. १९७१ मध्ये त्यांना ले ऑफ मिळाला. ४-५ वर्षे स्वयंशिक्षण व व्यवसाय केल्यानंतर झीलॉग कंपनीत ३० टक्के पगार कपात असणारी नोकरी मिळाली. इंदरनील व सुभाष बाल यांच्या मदतीने एक्सेलॉन या कंपनीची १९८२ मध्ये स्थापना. १९८९ मध्ये ही कंपनी नोव्हेलने २१० दशलक्ष डॉलरला विकत घेतली व नोव्हेल कंपनीत ते अधिकारी बनले. १९९४ मध्ये त्यांनी टीआयईची स्थापना केली. एक्झोडसमध्ये पैसे गुंतवले व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
४. नरेन बक्षी - १९६३ मध्ये बिटसमध्ये बी ई व अमेरिकेत एमएस व एमबीए केले. हिंदुथान मोटर्स व स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीत नोकरी केल्यानंतर अमेरी ट्रस्ट बॅंकेत उपाध्यक्ष झाले. १९७९ मध्ये टीआरडब्ल्यू कंपनीत संचालक. व्हर्साटा व व्हिजन सॉफ्टवेअर कंपन्यांची स्थापना. इ. स १९९८ मध्ये केवळ एक दशलक्ष भांडवल असणार्या व्हर्साटा कंपनीला इ. स. २००० मध्ये १०० दशलक्ष भांडवल शेअरमधून मिळाले. राजस्थान आयटी उद्योजकांसाठी RITEG संस्थेची स्थापना. त्यांची पत्नी कुसुम हिने अमेरिकेत RANA राजस्थानी असोसिएशन स्थापन केली. जैन मंदिरे व असोसिएशनच्या कामात आता व्यस्त.
५. प्रदीप कार - १९८१ मध्ये नागपूरमधून बीई. १९८३ मध्ये एमबीए. विप्रोत एक वर्ष नोकरी. १९८४ मध्ये कॉम्प्युटर पॉईंट, मुंबई, बंगलोर व दिल्ली येथे. शिवा कॉंप्युटर्सची स्थापना. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीत अधिकारी म्हणून अमेरिकेत नोकरी. १९८८ मध्ये परत भारतात. १९८९ मध्ये मायक्रोलॅंड कंपनीची स्थापना. नोव्हेलचे भारतातील एज्युकेशन सेंटर म्हणून मायक्रोलॅंडचे काम. १९९२ मध्ये कॉंम्पॅक कॉंप्युटर्सची स्थापना. सिनॉप्टिक व सिस्कोशी संबंध. इंडिया डॉट कॉम, ITspace.com व media2india.net वेबसाईटची निर्मिती.
६. राज सिंह - १९६८ मध्ये बीई, १९७० मध्ये आय आय टी दिल्लीत पीजी डिप्लोमा, १९८१ मध्ये मिनेसोटा युनिव्हर्सिटीत एमएस. नौदलात आयएनएस विक्रांतवर नोकरी. डिजिटल डिझाईन व व्हेरीलॉग वर पुस्तक प्रसिद्ध. InterHDL, Fiberlane Communications, Cerrent, Siara कंपन्यांची स्थापना. भांडवल पुरवठा करणार्या संस्थात भागीदारी.
७. सबीर भाटीया - बीएस व एमएस. अँपल कॉंप्युटर्स व नंतर फायर पॉवर सिस्टीम मध्ये नोकरी. फायर पॉवर सिस्टीममध्ये नव्या RISC प्रोसेसर असणार्या पॉवरपीसी चिपवर आधारित कॉंप्युटरची निर्मिती. १९९५ मध्ये जावासॉफ्ट कंपनीची स्थापना. DFJ कंपनीकडून १५ टक्के भागीदारीच्या मोबदल्यात ३ लाख डॉलरचे भांडवल मिळविले. १९९६ मध्ये HOTMAIL ची निर्मिती. एका वर्षात ५ दशलक्ष सभासद व दररोज ३०००० सभासदांची भर. मायक्रोसॉफ्ट ने हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलरला विकत घेतले. आरजू वेबसाईटची निर्मिती परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने साईट बंद केली. टेलेव्हॉईस कंपनीत सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
८. उमंग गुप्ता - आय.आय.टी. कानपूर मधून १९७१ मध्ये बी. टेक., १९७२ मध्ये अमेरिकेत एमबीए. व कॉपर फील्ड, ओहिओ येथे नोकरी. १९७३ मध्ये आयबीएममध्ये रुजू. भारतात आयबीएम मार्केटींग मॅनेजर म्हणून सहा महिने काम. मॅग्नसन कॉंप्युटर्समध्ये नोकरी. सिस्टीम आर विकसित केले. १९८४ मध्ये एसक्यूएल डाटाबेसवर आधारित प्रणालीसाठी गुप्ता टेक्नॉलॉजीजची स्थापना. गुप्ता टेक्नॉलॉजीजचे सेंचुरा सॉफ्टवेअर म्हणून नामांतर. कीनॊट सिस्टीम्समध्ये गुंतवणूक. नेटलॉक कंपनीचे अध्यक्ष.
९. एन. आर. नारायण मूर्ती - १९६७ मध्ये म्हैसूर् येथे बीई. १९६९ मध्ये आय.आय.टी. कानपूर मधून एम. टेक., सेसा या फ़्रेंच कंपनीत नोकरी. सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे दोन वर्षे नोकरी. १९७७ मध्ये पटनी कॉंप्युटर्समध्ये रुजू. केवळ २५० डॉलर भांडवलावर १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना. अमेरिका व फ़्रॉन्समधील कंपन्यांशी करार. १९८७ मध्ये बोस्टन येथे इन्फोसिसची शाखा. १९९३ मध्ये पब्लिक कंपनी म्हणून नोंदणी. १९९६ मध्ये ब्रिटन व १९९७ मध्ये जपानमध्ये शाखा. इ. स. १९९९ मध्ये नॅसडॉक स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी.
वरील सर्व उद्योजकांची चरित्रे वाचल्यावर मला पहिल्याप्रथम हे जाणवले की ही सर्व माणसे मध्यम वर्गातून पुढे आली आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात अपयश, निराशा व नोकरीतील अशाश्वतता व हाल अपेष्टा आल्या होत्या. पण या सर्वांवर मात करून केवळ चिकाटी, दुर्दम्य आत्मविश्वास व उच्च ध्येय गाठण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. आपल्याकडे बर्याच वेळा एकदा अपयश आले की मुले निराश होऊन प्रयत्न सोडतात. त्यांच्यासाठी चिकाटी व धाडस असले की कशी प्रगती साधता येते हे या उद्योजकांनी दाखवून दिले आहे.
आजच्या मंदीच्या व बेरोजगारीच्या काळात वरील उद्योजकांची चरित्रे निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व नवी प्रेरणा देणारी ठरतील. आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर पुस्तक लिहून लेखकाने नव्या पिढीसाठी अनमोल खजिना खुला केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. डॉ. सु. वि. रानडे
Hits: 68