मराठी विज्ञान महासंघ

मराठीतून विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या सर्व संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारी फेडरल पध्दतीची `मराठी विज्ञान महासंघ' ही संस्था ४ फेब्रुवारी १९७७ रोजी मुंबईत नोंदण्यात आली. मराठीतून विज्ञान प्रसार करणार्‍या विविध संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या निरनिराळया कार्यपध्दतीच्या अनुभवांचा फायदा सर्वांना मिळण्यासाठी अशा सर्व संस्थांचा एक संघ असावा या जाणिवेतून `मराठी विज्ञान महासंघाची' निर्मिती झाली. महासंघाची स्थापना ही विज्ञान प्रसाराच्या वेगवान प्रगतीमधील एक नैसर्गिक व अटळ घटना होय.

मराठी विज्ञान महासंघ हा संस्थांचा संघ असल्याने महासंघाला व्यक्ती सभासद नाहीत. महासंघाच्या घटक संस्थांच्या सर्व सभासदांचे प्रतिनिधित्व महासंघ करतो. घटक संस्थांचे स्वायत्त स्वरूप कायम राहून त्यांना त्यांच्या सभासद संख्येच्या प्रमाणात महासंघाच्या प्रतिनिधी मंडळावर प्रतिनिधित्व मिळते. विज्ञान व त्याच्या प्रसाराविषयी समाजात असलेली अनास्था तसेच कार्यकर्त्यांची वाण व तोकडे आर्थिक बळ या सर्वांवर मात करण्यासाठी घटक संस्थांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह हीच महासंघाची कार्यशक्ती.

महासंघाचे मासिक मुखपत्र `मराठी महासंघ विज्ञान' प्रकाशनास जुलै १९७८ पासून सुरूवात झाली. अखिल महाराष्ट्नत व महाराष्ट्नबाहेरही महासंघाचे १५०० सभासद विखुरले असल्याने या सर्वांशी सततचा संपर्क साधणे या मुखपत्राच्या आधाराने शक्य असल्याने हे प्रकाशन प्रतिमासी प्रकाशित करण्यात आजवर महासंघाला यश मिळाले आहे. महासंघाच्या घटकसंस्थांमार्फत होणाऱ्या वैज्ञानिक कार्याचा वृत्तांत, तसेच जगातील विशेष महत्वाच्या वैज्ञानिक घटनांची नोंद या मुखपत्रातून घेतली जात असल्याने सभासदापर्यंत वैयक्तिक स्तरावर विज्ञान पोहोचविणे महासंघास शक्य झाले आहे.

घटक संस्थांच्या कार्यात सुसूत्रता ठेवण्याचा एक भाग म्हणून समान व सदृश कार्यक्रम घटक संस्थांमार्फत महासंघ घडवून आणतो. समान असा एकच कार्यक्रम विविध घटक संस्थांमार्फत आयोजित केला जातो तर एखाद्या विषयाला धरून विविध कार्यक्रम निरनिराळया ठिकाणी सदृश कार्यक्रमावाटे आयोजित केले जातात. याशिवाय विविध विषयावर व्याख्याने, परिसंवाद, संस्थाभेटी, वैज्ञानिक चर्चा वगैरे कार्यक्रम घटक संस्थांमार्फत केले जातात.

Hits: 78