जोहान केप्लर
जोहान केप्लर |
(जन्म : २७-१२-१५७१, मृत्यू : १५-११-१६३०)
जर्मन ज्योतिर्विद. कोपर्निकस याने मांडलेल्या सूर्यकेन्द्री विश्व-कल्पनेचा (सर्व ग्रह आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरतात) पाठपुरावा केला आणि सूर्याभोवती ग्रहांचे व उपग्रहांचे मार्गक्रमण कोणत्या कक्षेत काय गतीने होते याचे कोडे उलगडून दाखवले. यासंबंधी केप्लरचे तीन नियम प्रसिध्द आहेत, ते असे :
(१) प्रत्येक ग्रहाची सूर्याभोवती फिरण्याची कक्षा विवृत्तीय, लंबगोलाकार असते. या लंबगोलाच्या दोन केन्द्रांपैकी एका केन्द्राशी सूर्य असतो.
(२) ग्रह आणि सूर्य एका काल्पनिक रेषेने जोडले तर ग्रहाच्या मार्गक्रमणात ही रेषा ठराविक काळात ठराविक क्षेत्रफळ आक्रमते. याचाच अर्थ जेव्हा ग्रह सूर्याचे जवळ असतो त्यावेळी तो अधिक वेगाने मार्गक्रमण करतो.
(३) ग्रह आणि सूर्य यांच्यातील सरासरी (मध्यम) अंतराचा घन हा त्या ग्रहाच्या सूर्याभोवतीचे एका प्रदक्षिणा कालाच्या वर्गाच्या प्रमाणात असतो. याचा अर्थ ग्रह जितका सूर्यास जवळ तितका त्याचा प्रदक्षिणा काल (वर्ष) लहान असतो.