डॉ. जयंत नारळीकर
जयंत विष्णू नारळीकर |
डॉ. नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर. त्यांचा जन्म १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर येथे झाला. गणिताचा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाला. त्याचे वडील, विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते. वाराणशी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते. डॉ. नारळीकरांचं संस्कृतवरही प्रभुत्व आहे. तो वारसा त्यांना त्यांच्या आईकडून मिळाला. त्यांची आई सुमती विष्णू नारळीकर ह्या संस्कृत विदुषी होत्या.
डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात गेले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. त्या काळात त्यांना रँग्लर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे मिळाली.
त्यांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एचडी. केली. सर फ्रेड हॉईल डॉ. नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले. त्यामुळे १९६६ जेव्हा हॉईड यांनी केंब्रीज येथे `इन्स्टिटय़ूट ऑफ थिऑरॉटीकल ऍस्ट्रॉनॉमी' नावाची जी स्वत:ची संस्था सुरू केली, त्यात डॉ. नारळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता. १९६६ ते १९७२पर्यंत ते या संस्थेशी निगडीत होते. सर हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत' या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साधर्म्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.
दरम्यान डॉ. नारळीकरांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिराव राजवाडे यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत - गीता, गिरिजा व लिलावती.
आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवल्यानंतर भारतातील खगोल शास्त्रातील संशोधनाला आणि लोकप्रियतेला गती देण्यासाठी १९७२ साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या (टी.आय.एफ.आर.) खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून पद स्वीकारले. कालांतराने १९८८ साली त्यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्त झाली.
डॉ. नारळीकर शास्त्रज्ञ म्हणून ख्यातनाम तर आहेतच, पण त्याच बरोबर मराठी साहित्यात त्यांनी फार मोलाची भर घातली. विज्ञानकथांना त्यांनी मराठीत चालना देण्याचं महत्त्वाचं काम केलं. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी अनेक लेख आणि कथा लिहिल्या. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या `यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.मराठीच नव्हे, तर भारतातील सर्व भाषांतील गणित आणि विज्ञानातील पाठ्यपुस्तकांचा अभ्यासक्रम काटेकोरपणे रचण्याचे कामही ते करीत आहेत.
त्यांच्या महान कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली. त्यामुळे त्यांना अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. १९६५ साली त्यांना पद्मभूषण तर २००४ साली पद्मविभूषणने सन्मानीत करण्यात आले. शिवाय डॉ. भटनागर स्मृती पारितोषिक, एम.पी. बिरला सन्मान आणि फ्रेंच ऍस्ट्रॉलॉजिकल सोसायटीचा पिक्स ज्यूल्स जेन्सनसारखे सन्मानही त्यांना प्राप्त झाले. लंडनच्या रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सहाधिकारी आहेत, तर इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ल्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते अधिछात्र आहेत. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमीच्या इंदिरा गांधी पारितोषिकानेही त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे. वैज्ञानिक विषयांत साहित्यिक लिखाण करून विज्ञानाचा प्रसार करण्यासाठीही त्यांना १९९६ साली युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
आजही पुण्यातील `आयुका'च्या माध्यमाने ते संशोधन कार्यात मग्न आहेत. आज चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.
संशोधन
स्थिर स्थिती सिद्धान्त
चार दशकांहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
पुरस्कार
१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला.
२००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला.
२०१० मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला.
त्यांना भटनागर पुरस्कार आणि एम. पी. बिरला पुरस्कारही मिळाले आहेत.
विज्ञानकथा पुस्तके
वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ (अनुवाद, मूळ लेखक:फ्रेड हॉयल Fred Hoyle)
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी
टाइम मशीनची किमया
याला जीवन ऐसे नाव
इतर पुस्तके
आकाशाशी जडले नाते
विज्ञानाची गरुडझेप
गणितातील गमतीजमती
विश्वाची रचना
विज्ञानाचे रचयिते
नभात हसरे तारे