वराहमिहिर (४९०-५७३)

ज्योतिबिंदू व फलज्योतिषी असून उज्जयिनीच्या वेधशाळेचा संचालक होता. विक्रमादित्याच्या दरबारांतील नवरत्नापैकी एक होता. त्यासंबंधी "ख्यातो वराहमिहिरो नृपते: सभावाम्'' असा उल्लेख सापडतो. स्वाभिमानांत फुरंगटून न बसतां परकियांचे जे चांगले होते ते पचवून त्यानें फलज्योतिषाला भारतीय वेष चढविला. त्याचे बृहजातक, लघुजातक, समाससंहिता, वृद्दत्संहिता आणि पंचसिध्दरन्तिका (पैतामह-प्रणाली, रोमक-प्रणाली, पौलिश-प्रणाली, वशिष्ट-प्रणाली आणि सूर्य-प्रणाली) हे ग्रंथ प्रसिध्द आहेत. वराहमिहिराचें लक्ष नाना प्रकारचे सृष्टिचमत्कार, पदार्थाचे गुणधर्म व त्यांचा व्यवहारांत उपयोग याकडे लागलें असावें. कारण अणुरेणूंच्या सूक्ष्मतेबद्दल विवेचन करतांना सूर्यकिरणांत दिसणाऱ्या सूक्ष्म असरेणूची जाडी इंचाच्या १/३४९५३५ इतकी सूक्ष्म भरेल असें त्यानें सांगितले आहे. हा वेधशाळेचा संचालक असल्याने नेत्रवेध घेण्यांत पटाईत होता. नुसत्या डोळयांनी वेध घेण्याऐवजी नलिकेनें वेध घेतल्यास मर्यादित व विशिष्ट ज्योतीवर लक्ष केंद्रित करतां येतें असें तो म्हणतो. हा दृक्प्रत्ययाचा फार भोक्ता होता. वेदकालीन वाङ्मयांत वसंतसंपात कृत्तिका नक्षत्रांत पडत आहे असा उल्लेख आहे. वराहमिहिरानें जेव्हा वेध घेतले त्या वेळी त्याला तो अश्विनी नक्षत्रांत दिसला, पण दृक्प्रत्ययावर निष्ठा असलेल्या या ज्योतिर्विदानें "उक्ताभाव: विकृति: प्रत्यक्षपरीक्षणै: व्यक्ति:'' पूर्वाचार्याच्या विरूध्द आपण लिहीत असलों तरी प्रत्यक्ष परीक्षणावरून लिहीत आहोंत असें स्पष्टपणें प्रतिपादन केलें. मेष = अश्विनी + भरणी + १/४ कृत्तिका. वगैरे ही जी आपल्या पंचांगात राशि व नक्षत्रें यांची सांगड घातलेली दिसते ती त्यानें घातली, व ती बृहत्संहिता या ग्रंथांत नमूद केलेली आहे. वराहमिहिरानें कालमापनाकरितां अचूक असें घटिकापात्र तयार केलें होतें. सहा अंगुळें त्रिज्या असलेलें व २४० तोळे पाणी मावेल असें एक अर्धगोलाकृति ताम्रपात्र घेऊन त्याला ४ अंगुळें लांबीची व ३१/३ मासे माराची सोन्याची सुई जाईल एवढें भोंक तळाशी पाडावें, अशी सूचना दिलेली आहे. उज्जयनीच्या वेधशाळेंत सम्राट्यंत्र, ज्योतीची क्रांति काढण्यास रामयंत्र (ज्योतीचे उन्नतांश व दिगंश काढण्यास) वगैरे साधनें वापरली जात.

Hits: 65