पावसाचे पाणी आणि डेंग्यु तापाची साथ

डेंग्यू ताप (हाडमोडी ताप) हा एक विषाणूजन्य रोग आहे. हा ताप डेंग्यू (DENV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याव्दारे तो प्रसारित केला जातो. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. एडीस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे 5 मिलीमीटर असतो. हा आपल्या शरीरात विषाणू तयार करायला 7 ते 8 दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो.साधारणपणे हे डास सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.

पावसाचे पाणी नैसर्गिकरीत्या शुद्ध असले तरी त्यात जंतुनाशक मिसळल्याखेरीज ते संरक्षित प्रकारात (Protected water) मोडत नाही. डेंग्यु ताप पसरविणार्‍या विशिष्ट डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. त्यामुळे पावसाचे पाणी साठविताना योग्य काळजी घेतली नाही तर त्यात असे डास वाढण्याचा धोका असतो.


पुणे, मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरात पावसाचे पाणी साठविण्यासाठी ज्या योजना सुरू झाल्या आहेत. त्या राबविताना पाण्याच्या साठ्याची योग्य काळजी घेतली नाही तर असा धोका मोठ्या शहरांमध्ये अधिक प्रमाणात जाणवण्याची शक्यता मुंबईतील ख्यातनाम पर्यावरण तज्ज्ञ आरसीवाला यांनी आपल्या लेखात जानेवारी २०१४ मध्येच व्यक्त केली होती. याचे महत्वाचे कारण म्हणजे मोठ्या शहरात असणारी दाट लोकवस्ती व बहुतेक जमिनीचा पृष्ठभाग रस्ते व फरशांमुळे झाकला गेल्याने पाणी जमिनीत मुरण्यास कमी वाव व पाणी शोषून घेणार्‍या वनस्पतींचा अभाव. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना त्यांना जे अनुभव आले यावर या लेख आधारित आहे. ज्यांना या विषयी अधिक माहिती हवी असेल त्यांनी आरसीवाला यांचा खालील लेख वाचावा.

(Ref: "Rainwater Harvesting & Dengue" - Soli Arceivala, Journal of Environmental Science & Engineering, Vol. 56, No. 1, January 2014 Email - This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.)

सध्या मुंबईत येथे डेंग्युची साथ उद्‌भवल्याच्या बातम्या येत आहेत. आरसीवालांच्या या इशार्‍याकडे महापालिका अधिकार्‍यांनी लक्ष देऊन वेळीच योग्य खबरदारी घेतली असती तर डेंग्यू पसरविणार्‍या डासांची वाढ होण्यास प्रतिबंध करता आला असता. डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला प्रसरवण्यापासून थांबू शकतो. घराच्या आजुबाजूला वा स्लॅबवर पाणी साठू न देणे तसेच वेळच्यावेळी साठलेले पाणी रिकामे करणे यामुळे अशा डासांची उत्पत्ती होण्यास प्रतिबंध होऊ शकतो.

निदान आतातरी सर्व पर्जन्य जल संकलन योजनांची तपासणी करून सर्व पाण्याच्या साठ्यांवर डासप्रतिबंधक झाकण वा जाळ्या बसविणे अत्यावश्यक आहे. तसेच इमारतीच्या छतावरील सर्व टाक्या तसेच सांडपाण्याचे नळ यांच्यासाठी जे व्हेंटिलेटर नळ बसविलेले असतात त्यांच्या उघड्या टोकातून डास आत बाहेर जाऊ शकतात. यासाठी अशा सर्व व्हेंटीलेटर पाईपच्या वरच्या टोकावर प्लॅस्टीक वा तारेची जाळी बसविणे महापालिकेने अनिवार्य करणे गरजेचे आहे.

श्री आरसीवाला यांनी पावसाच्या पाण्याच्या संकलन पद्धतीत असणार्‍या ज्या त्रुटी दाखविल्या आहेत त्यांचा साकल्याने अभ्यास व्हावा व योग्य ती उपाय योजना अमलात आणावी असे मला वाटते. आरसीवाला यांच्या या लेखाबद्दल त्यांचे अभिनंदन !

Hits: 47