प्रदूषण निदर्शक जलपर्णी
महाराष्ट्रातील बहुतेक सर्व नद्यांमध्ये उन्हाळ्यात जलपर्णी वाढलेली दिसते. जलपर्णी असेल तर नदीचा प्रवाह खुंटतो. हवेतील ऑक्सिजन पाण्यात मिसळण्याची क्रिया मंदावते. डासांचा प्रादुर्भाव वाढतो व लोकांना प्रदूषण झाल्याचे लक्षात येते. मग जलपर्णी काढण्यासाठी मोहीम राबवली जाते. जलपर्णी पूर्ण काढून टाकली की नदी प्रदूषणमुक्त होईल अशी लोकांची समजूत असते. मात्र जलपर्णी समूळ नाहिशी करण्याचे काम अशक्यप्राय आहे हे नंतर दिसून येते. पावसाळा आला की जलपर्णी वाहून जाते. प्रदूषणाचा प्रश्नही विस्मृतीत जातो.
जलपर्णी म्हणजेच प्रदूषण व जलपर्णी काढली की नदी प्रदूषणमुक्त होईल हा समज मात्र पूर्ण चुकीचा आहे. जलपर्णी वाढणे हा प्रदूषणाचा परिणाम आहे कारण नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.
शहराच्या सांडपाण्यातून वा रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणार्या पाण्यातील वा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढते. ही पोषक द्रव्ये पाण्यात मिसळणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत जलपर्णीची वाढ अनिर्बंधपणे होत राहते. याच पोषक द्रव्यांवर व इतर सेंद्रीय पदार्थांवर जीवाणूंची ही वाढ होत असते. अनेक रोगजंतू पाण्यात टिकून राहण्यात व त्यांची वाढ होण्यात या दूषित पदार्थांचा सहभाग असतो.हे आपल्या लक्षात येत नाही. कारण हे जीवाणू आपल्याला दिसत नाहीत.
जलपर्णीची वाढ ही त्या अर्थाने प्रदूषणाची निदर्शक आहे. जलपर्णी म्हणजे प्रदूषण नव्हे. जलपर्णी वाढलेली दिसली की जिवाणूंचा धोका वाढलेला आहे हे आपण ओळखले पाहिजे. व जलपर्णी काढण्याबरोबर या जीवाणूंची वाढ रोखण्यासाठी नायट्रोजन, फॉस्फरस व सेंद्रीय पदार्थांचे पाण्यात मिसळणे थांबवावयास हवे.
मात्र नायट्रोजन व फॉस्फरस ही पोषक द्रव्ये शोषून घेण्याच्या गुणधर्माचा उपयोग करून या जलपर्णीचा उपयोग सांडपाणी शुद्धीकरणासाठी केला जातो हे ऎकून आपल्याला आश्चर्य वाटेल. सूर्यप्रकाशाखेरीज वेगळ्या ऊर्जेची गरज नसणारी ही पद्धत आता अधिक प्रभावी व कमी खर्चाची असल्याने भारतात अधिक मान्यता पावत आहे.