उघड्या नाल्यातील सांडपाणी

सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेने घंटागाडी व कचरा उठाव पद्धत सुरू केल्याने कचर्‍याच्या समस्येवर बर्‍याच अंशी नियंत्रण मिळविले आहे. मात्र गुंठेवारीच्या वा ड्रेनेज नसणार्‍या भागात पाणी न शोषणार्‍या काळ्यामातीमुळे सांडपाणी प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

सांगलीसारख्या इतर अनेक शहरांतील झोपडपट्ट्यात हीच परिस्थिती पहायला मिळते. अनेक भागात मोकळ्या प्लॉटमधील वा उघड्या गटारीतील सांडपाणी ढाळ नसल्याने तुंबून राहिल्याने आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होतात. केवळ नाला सफाई व निर्जंतुक औषध फवारणी यांनी हा प्रश्न सुटत नाही. यासाठी कचरा उठाव पद्धतीप्रमाणे साठलेले सांडपाणी पंप करून टँकरद्वारे ते जवळच्या वाहत्या नाल्यात वा भूमिगत ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये सोडण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे.

डिझेलवर चालणारे छोटे स्लरी-पंप असलेल्या टँकरचा वापर करून ( सेप्टीक टँकमधील गाळ काढण्यासाठी अशी व्यवस्था असते.) घंटागाडीप्रमाणे दर दोन दिवसांनी जर सर्व साठलेले पाणी पंप करून गटारे रिकामी ठेवली तर शहर-स्वच्छता अभियानास यश येईल.

यासाठी ड्रेनेज नसणार्‍या सर्व भागातील वस्त्यांचा सर्व्हे करून पर्यायी मलजल निर्गत योजना निश्चित करून त्यासाठी आवश्यक ते पंप, टँकर व कर्मचारी वर्ग यांची नियुक्ती करून हा प्रश्ने प्राधान्याने सोडविला तर राबविली पाहिजे. जरी प्रस्तावित भूमिगत ड्रेनेज योजना पूर्ण झाल्यावर अशा व्यवस्थेची गरज उरणार नसली तरी ड्रेनेज योजनेस बराच कालावधी लागत असल्याने ही आपत्‌कालीन स्वच्छता योजना आवश्यक आहे.

नैसर्गिक नाले बंद करून बांधकामे केलेल्या इमारती तॊडून नाला मोकळा करण्यात बरेच अडथळे येतात. अशा बांधकाममालकांना स्वखर्चाने सुवेज पंपिंग स्टेशन बाधून पाणी पंप करून ते बंद नळाने भूमिगत ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये सोडण्याची व्यवस्था सांभाळण्याची सक्ती केल्यास प्रदूषण टाळता येईल. या पर्यायावरही विचार व्हावयास हवा.

Hits: 56