स्वच्छ भारत - प्रकल्प नियोजन
भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रभाई मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत’ हे जन आंदोलन हा एक दिवसाचा कार्यक्रम नसून ते सातत्याने करावयाचे कार्य आहे. स्वच्छ भारत या योजनेचा मोठा आवाका लक्षात घेता या प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी व्हावयाची असेल तर जनतेने करावयाच्या कार्याचे योग्य नियोजन होण्याची गरज आहे.
सर्वप्रथम स्वच्छ भारत या मोठ्या योजनेची भौगोलिक व उद्दिष्टानुसार विविध छोट्या योजनांमध्ये विभागणी करण्याची आवश्यकता आहे. उदा.
भौगोलिक विभाग - राज्य, जिल्हा, तालुका, शहर, गाव, मोहल्ला, रस्ता इत्यादी.
उद्दिष्टानुसार विभाग - घनकचरा सफाई, सांडपाणी निचरा व प्रक्रिया, नदी व तलाव शुद्धीकरण, वाहने व कारखान्यातील धुरामुळे होणार्या हवा प्रदूषणावर नियंत्रण
या योजनांमध्ये नागरिकांचा सहभाग घेताना त्यांच्या शिक्षण व कौशल्यविविधतेचा विचार करून योग्यप्रकारे कार्याचे वाटप केले व त्यांच्या शारिरिक श्रमाबरोबर बौद्धिक व अर्जित क्षमतेचा वापर करण्यावर भर दिला तर या योजना अधिक परिणामकारकपणे निर्धारित कालावधीत व कमीत कमी खर्चात पूर्ण करणे शक्य आहे.
या सफाई अभ्यानात लोकसंख्येतील विविध सामाजिक घटकांना वेगवेगळे काम देता येईल. वृद्ध, गृहिणी व लहान मुले यांचा एक गट, शालेय विद्यार्थ्यांचा एक गट, महाविद्यालयीन विद्यार्थी व बेरोजगार यांचा एक गट आणि नोकरदार, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आणि शेतकरी यांचे गट अशाप्रकारे समाजाचे कार्यक्षमतेनुसार गट करता येतील व त्यांना जमू शकेल असे काम त्यांना देता येईल. शिक्षक, प्राध्यापक, शासकीय व निमशासकीय अधिकारी व राजकीय नेते यांच्याकडे या प्रकल्पाचे संकल्पन, मार्गदर्शन व अंमलबजावणीची जबाबदारी देता येईल.
कोणत्याही नव्या प्रकल्पाची आखणी करताना सद्यस्थितीचा अभ्यास करणे आवश्यक असते. यासाठी असे सर्वेक्षण करणे, उपलब्ध साधन सामुग्री, प्रचलित पद्धतीत वापरले जाणारे मनुष्यबळ व खर्च यांचे मूल्यमापन करून कार्यक्षमतेतील त्रुटींचा अहवाल तयार करणे ही प्राथमिक पायरी आहे.
नव्या प्रकल्पासाठी किती मनुष्यबळ, कोणती साधनसामुग्री, कोणते तंत्रज्ञान, किती खर्च व किती कालावधी लागेल याचे तपशीलवार अहवाल तयार केल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येतो.
जरी लोकसहभागातून ‘स्वच्छ भारत’ अभियान चालवायचे असले तरी हा भारत सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने त्याचे शास्त्रशुद्ध नियोजन होण्याची नितांत गरज आहे.