ग्रीन बिल्डिंग

ग्रीन बिल्डिंग हा शब्द वाचताच अचंबित होण्याची वेळ येते. परंतु संपूर्ण जगतात याबाबत होत असलेली जागृती पाहता आपणासही याचे महत्व जाणवू लागते. पर्यावरणातील असमतोल व पर्यायाने घडत चाललेले अनेक प्रयोग, यातून मनुष्याची जीवनशैलीच आमूलाग्र बदलत आहे. या सगळ्याचा सर्वांगाने विचार व्हावा व यातून योग्य तो मार्ग निघावा ही सगळी विचारमंथने सध्या चालू आहेत.

जगभरात होत असलेले मोठे भूकंप, वादळे, सुनामी, ऋतूमधील बदल एक ना दोन! यादी करताना लक्षात यायला लागले की, या सगळ्याची अनेकविध अंगे असली तरी त्यासर्वात महत्वाचा एकच समान मुद्दा आहे - आणि तो म्हणजे निसर्गातील असमतोल. यातील खारीचा वाटा प्रत्येकाने आपापल्या परीने उचलायलाच हवा. जगभरातून पुढे आलेली कार्बन क्रेडिटची संकल्पना ही तर यातील अतिमहत्वाकांक्षी योजनाच म्हणावी लागेल. ग्लोबल वॉर्मिंग - ओझोन हो शब्द रोज कानावर पडू लागले आहेत. या सगळ्यांचे महत्व वेगळ्या पद्धतीने जाणवू लागले आहे. आपल्या परिसरातील सर्वसामान्यांबरोबरच, जगातील अत्त्युच्च स्थानी पोहोचण्याच्या प्रयत्नातील कॅम्पस इंटरव्ह्यूला सामोरे जाणाऱ्या नवयुवक-युवतींस यातीलच काही अंगांची ओळख असणे मला महत्वाचे वाटले व म्हणूनच ग्रीन बिल्डिंग या महत्वपूर्ण विषयाला हात घातला.
इमारतीची रचना, बांधकाम, व वापर यासगळ्यांचा एकत्रितपणे पर्यावरणावर होणारा परिणाम अतिशय महत्वाचा ठरत आहे. प्रगतीचा एक अविभाज्य घटक असणारा बांधकाम/इमारत हा विभाग पर्यावरणास मोठे आव्हान ठरू पहात आहे. अगदी विद्युत वापरतील २०% भाग हा इमारतीसाठी वापरला जातो. देशाची/राष्ट्राची, जगाची पर्यायाने मानवाच्या प्रगतीतील एक मुख्य घटक/माध्यम म्हणजे जमीन. जमीन वापरातील प्रचंड मोठ्या प्रमाणातील बदल हे बांधकाम - त्यासाठीच्या मूलभूत गरजा इन्फ्रास्ट्रक्चर उदा. रस्ते,महामार्ग, विमानतळ या सगळ्यामुळे घडत असलेला निसर्गातील जमीन आवरणातील बदल अत्यंत महत्वाचा ठरत आहे. अत्याधुनिक शास्त्र - विज्ञान याचा वापर करुन आपणास लागणारी प्रगतीची माध्यमे, त्याचा परिणाम व त्यावरील उपाय हे सर्वच विषय आता रोजचा घटक बनू पहात आहे.
आपण गेल्या कित्येक वर्षापासून पाणी/त्याचे दूरगामी परिणाम यावर बोलतो/चर्चा करतो, परंतु सगळेच घटक जुळून येत नसल्याने यातील प्रत्यक्ष लाभ मिळण्याचा कालावधी मात्र लांबतचालला आहे. त्याचा उपभोगकर्ता यासाठी पूर्णपणे परिपक्व बनत चालला आहे. हे सर्व कशासाठी -
" माना के गुल को गुलशन ना बना सकेंगे हम
मगर कुछ कांटे तो कम कर सकेंगे हम "
ग्रीन बिल्डिंग हा विषयही याच धर्तीवर महत्वाचा ठरतो. याचा परिणाम पर्यावरणातील उलट परिणामांसाठी उपयुक्त ठरू शकेल. आस्तित्वात असलेल्या इमारतींचा पर्यावरणावरील परिणाम कमी करू शकतील. रचना, बांधकाम व वापर यावरील खर्चात व यामुळे होणाऱ्या परिणामांना काटशह देऊ शकतील. याचे आणखी होणारे जादाचे फायदे म्हणजे वापरच्या खर्चातील कपात, याचा वापर करणाऱ्यांवरील मानसिक व शारीरिक परिणाम व त्यातील उत्तम बदल, इमारतशास्त्रातील विक्री योग्य वाढीव उपयुक्तता, काम करणाऱ्यांच्या सकारत्मक वातावरणातील परिणामांमुळे होणारी चांगली उत्पादकता व अंतरंगातील सुयोग्य परिपक्वता व त्याचा वापर करणाऱ्याव्रील परिणाम. या पद्धतीच्या इमारतीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अभ्यासावरून त्यांच्यातील उत्पादनात १६ ते १८% वाढ झालेली दिसून येते. त्यांच्या हजेरीपत्रकातील हजेरीत झालेली वाढ, उत्पादनातील सुसूत्रता, आनंदी वातावरण व दर्जातील उत्तमता हे ग्रीन बिल्डिंग्ज ह्या सध्याच्या "User Friendly" बरोबरच "People Friendly" असल्याचे द्योतक आहे. म्हणजेच ग्रीन बिल्डिंग ह्या पर्यावरणयोग्य स्वस्त व सामाजिक समतोल साधणाऱ्या उपयुक्त इमारती ठरून त्यांचे मालक, वापर करणारे, यात आपले सर्वस्व लावणारे पर्यायानेच सर्वसामान्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत. इंडियन ग्रीन बिल्डिंग कौंन्सिल (IGBC) ची स्थापना २००१ साली भारतात कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीच्या (CII) माध्यमातून झाली. यातूनच "LEED" (Leadership in Energy Environmental Design) या अमेरिकेत प्रचलित असलेल्या माध्यमाचा भारतीय संदर्भ व मोजमापाचे माध्यम म्हणून सुरू झाले आहे.

Hits: 54