मनोगत

कविवर्य मोरोपन्तांनी वर्णिल्याप्रमाणे :-

कृतान्तकटकामल ध्वज जरा दिसो लागली ।
पुर:सर गदांसवे झगडतां तनू भागली ।।

माझी स्थिती आता अशी झालेली आहे. त्यामुळे वेदांतील आपल्याला उपलब्ध असलेली ज्योति: शास्त्राची (खगोल विज्ञानाची) माहिती व त्यावर सुचलेले विचार वाचकांपुढे असावेत, म्हणजे पुढे कोणीतरी समानधर्मी त्यावर संशोधन करू शकेल या विचाराने भअणुतून अनंताकडे हे पुस्तक पदरमोडीने लिहून जमेल तितक्या स्वस्त किमंतीत प्रकाशित केले. त्याला वाचकांचा अतिउत्तम प्रतिसाद मिळाला, अक्षरश: शेकडो पत्रे मला संपूर्ण भारतातून, जर्मनी, इंग्लंड व अमेरिकेहूनही आली. हया पुस्तकाबद्दल मला `स्वातंत्र्यवीर सावरकर' हा १९९९चा पुरस्कार मिळाला.शिवाय "Centrally sponsored scheme of Improvement of Science Education in Schools 2001-2002" हया मध्यवर्ती सरकारच्या स्कीमखाली हे पुस्तक शाळा-शाळांच्या लायब्ररीत पोहोचले, त्यासाठी पुर्नमुद्रण करावे लागले.

मध्यंतरी माझा वेद व उपनिषदांचा अभ्यास चालूच होता. वेदांतील खगोल विज्ञानांस खरोखर तोड नाहीं. मूलभूत अशा अत्यंत गहन गूढ विषयाला हात घालणे, अवकाशाला कवेंत पकडण्याचा प्रयत्न करणे हा वैदिक ऋषींचा, प्रज्ञावन्तांचा लक्षणीय विषय होता. अतिगूढ काल, अनंतब्रह्म, निराकार परब्रह्म, सृष्टी उत्पत्तीपूर्व प्रलयावस्था, सृष्टी निर्मिती आदी अर्मूत गूढांना आपल्या शब्दजालात धरून मूर्त करण्याची किमया वैदिक ऋषिंनी केली आहे. ऋषींचे हे अनुभव त्यांचे काव्य हे विज्ञानवादी विचारवंतांना व तर्कशरण तरूण अभ्यासकांना मान्य असलेल्या ज्ञानशाखेद्वारे, सुस्पष्ट करणेचा प्रयत्न या आभाळमायेत केला आहे.

१. ऋग्वेदातील तेहतीस देवतांचे (३३ कोटीनाहीं!) वैज्ञानिक स्वरूप,
२. वेदकालीन व्यष्टीतील (म्हणजे पृथ्वीजवळील) सप्तलोक आणि सप्तपाताळ यांचे विज्ञाननिष्ठ निरूपण,
३. नासदीय सूक्तांतील विश्वनिर्मिती व सृष्टीउत्पत्ती सुक्तातील तारकांच्या ग्रहांच्या निर्मितीचे वैज्ञानिक विवेचन,
४. वेद व रामायण काळी अण्वस्त्रांची माहिती होती त्याचे निरूपण,
५. वेदांत अश्विनी कुमारांच्या विमानाचे वर्णन आहे, त्याचे विज्ञाननिष्ठ भूमिकेतून केलेले सचित्र वर्णन,
६. समष्टितील सप्तलोक म्हणजे विश्चब्रह्माण्डा बाहेरची सृष्टी कशी आहे त्याचे आकार, वस्तुमानसह केलेले विज्ञाननिष्ठ निरूपण,

७. विश्व-ब्रह्मांडातील अतिसूक्ष्म व अतिविशालाची वैदिकवचने स्पष्ट केली आहेत.

वेदावर आधुनिक काळी अनेक प्रज्ञावान पंडितांनी भाष्य केले आहे त्याचा आढावा घेऊ. प्रसिध्द सूर्योपासक कै. भवानराव पंतप्रतिनिधी यांचे चिरंजीव भैरयासाहेब उर्फ कै. मा. भ. पंत, हे खगोलविज्ञानाचे जाणकार होते. त्यांनी ऋग्वेदातील मंडल एक मधील `अग्नि विषयी सूर्यसूक्त क्र. १-१४० व १-१४१, हया दोन्ही सूक्तांचा प्रदीर्घ अभ्यास करून, `दीर्घतमस आणि सूर्य या नावाचे अप्रतीम पुस्तक १९७० साली प्रसिध्द केले आहे. हया सूक्तांचा कवि आहे दीर्घतमस् ऋषी आणि विषय आहे अग्नि. अग्नीचा वैदिक अर्थ वसंतसंपात समयीचा भसवितृमंडळ मध्यवर्ती नारायण म्हणजे सूर्य. अशा सूर्याच्या रौद्र, चक्रीवादळी स्वरूपाचे वर्णन १४०व्या सूक्तांत तर, १४१ व्या सूक्तांत सूर्याच्या शांत स्वरूपाचे वर्णन मोठया बहारदार रितीने केले आहे. दीर्घतमस् ऋषीने काव्यांत सूत्रमय पध्दतीने सांगितलेले यथार्थ ज्ञान आधुनिक शास्त्रीय ज्ञानाशी तंतोतंत जुळते, हे मला आवर्जुन वाचकांच्या लक्षात आणून द्यायचे आहे.

दुसरे प्रज्ञावान व सिध्द पुरूष म्हणजे पुण्याचे प्रतिथयश सर्जन (डॉ) पं. वि. वर्तक होत. त्यांनी मुंडक, मांडुक्य, तैत्तिरीय, ऐतरेंय, इश, केन, कठ व प्रश्न या उपानिषधांचा सखोल अभ्यास करून विज्ञाननिष्ठ निरूपण दोन भागांत केले आहे. त्यांनी ब्रह्मापर्यंत स्वत: मनसोक्त भरा या मारल्या आहेतच, पण वाचकांनाही ते ब्रह्मापर्यंत उचलून नेतात व ब्रह्मांत न हरवता परत विषयाशी सुखरूप पोहोचवितात. डॉ. प.वि.वर्तकांचे दुसरे मोठे कार्य म्हणजे त्यांनी ऋग्वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीतेचा काळ अगदी वर्ष व तारखेसह त्यावेळच्या ग्रह नक्षत्रांच्या अवकाशांतील स्थितीवरून गणिताद्वारे निश्चित केला आहे.

पुण्यनगरीतील अजून एक प्रज्ञावान, व्यक्तीमत्व म्हणजे कै.प्र.वा.गोखले, इलेक्ट्रीकल इंजिनीयर हे होय. त्यांनी विज्ञानाच्या भाषेत भारतीय तत्वज्ञानाचा अर्थ लावणे हे परमेश्वरी कार्य आहे, असे समजून आध्यात्म - विज्ञान मालिकेच्या ज्ञानाने ओतप्रोत भरलेल्या सहा पुस्तिका इ.स.२००२ साली प्रसिध्द केल्या आहेत. हया सर्व पुस्तिकातील त्यांचे लेख पुण्याच्या भसंतकृपा मासिकात वेळोवेळी प्रसिध्द झाले आहेत. संपादक माननीय ना.वि.काकतकर यांनी मोठया आवडीने ते लेख प्रसिध्द केले आहेत.

भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव व चांगदेव पासष्टी हे माझे जीव की प्राण ! खरे तर श्री. ज्ञानेश्वर माऊलीच्या हया महान रचनां अत्यंत गूढ आहेत, त्यातील ज्ञानविज्ञान समजणेइतकी माझी प्रज्ञा नाही. त्यांचेपैकी चांगदेव पासष्टी ! फक्त ६५ ओव्या ! पण अत्यंत गूढ गभीर असा ज्ञानाचा सागर. त्यावर कुणी एक अनोळखी अडसुळे नामक व्यक्ती इंग्रजीत प्रत्येक ओवीवर विज्ञाननिष्ठ विवरण लिहून इंग्लंड, अमेरिकेत ख्यातनाम पावते. हे कळल्याबरोबर ग्रंथ विकत आणून वाचून काढला. आणि ज्ञानाचा खजिनाच मला गवसला!

इंदूरनगरीचे भूषण श्री प्रभाकर अडसुळे यांनी लिहिलेल्या "Unito Mystica" हया ग्रंथाचे प्रकाशन १९९२ साली भारताचे राष्ट्रपती सन्माननीय श्री. शंकर दयाळ शर्मा हयांचे हस्ते राष्ट्रपतीभवनांत झाले.
चांगदेव पासष्टी चे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीकोनातून विवेचन करणारा हा ग्रंथ केवळ अपूर्व-अप्रतिम असा आहे. चांगदेव पासष्टी हे भारतीय अध्यात्म दर्शनातील सर्वोच्च्य शिखरस्थ दर्शन आहे. नवविज्ञानाला या शिखराकडे जायचे आहे, ते या ध्रुवता याकडे झेपावत आहे, असे श्री.प्रभाकर अडसुळे यांनी या ग्रंथात साधार सप्रमाण प्रतिपादन केले आहे. चांगदेव पासष्टीत सृष्टीच्या उत्पत्तीचा आणि उत्पन्न झालेल्या सृष्टीदर्शनाचा(म्हणजे Theory of Creation and theory of perception) सिध्दांत मांडला आहे. तर हे चैतन्य विज्ञान उद्याचे जागतिक विज्ञान होणार आहे. असे साधार सत्यावर आधारलेले विधान श्री. अडसूळांनी केले आहे व ही वस्तुस्थिती स्पष्टपणे जाणवू लागली आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या ग्रंथाचे नांव "Unito Mystica ( A post-quatum science)" असे ठेवले आहे. आज वैज्ञानिक Quantum mind म्हणत आहे. उद्या ते Quantum self संबोधतील यांत शंका नाही. श्री. अडसुळ यांच्या Unito Mystica हया ग्रंभाला केंब्रीज येथील "International Biographical Centre" ने १५-२-१९९९ रोजी रौप्यपदक देऊन त्यांचा सन्मान केला व त्यांचे नाव "Outstanding people of 20eth century च्या यादीत समाविष्ट केले आहे. श्री. अडसुळे यांना हा सन्मान "In the honour of an outstanding contribution to the science of consciousness" (म्हणजे चैतन्य विज्ञान) या साठी देण्यांत आला आहे. म्हणजे भचैतन्य विज्ञानांस पश्चिमेकडील वैज्ञानिकांना शेवटी मान्यता द्यावी लागली. हेही नसे थोडके!

वेद म्हणजे तत्वज्ञानाचा महासागर होय, वेदांची व्याप्ती विचारांत घेता, त्यावर भाष्य करणे, हे एकदोघांचे काम नाही. नव्या पिढीला वेदांचे महत्व उमगावे यासाठी शास्त्री-शास्त्रज्ञ यांनी सांधिक प्रयत्न करणे अत्यावश्यक वाटते. आज अशा संघटना पाश्चिमात्य देशांत कार्य करीत आहेत, तशा भारतातही आहेत. पण त्यांच्यात शास्त्रीय काटेकोरपणाचा अभावच आहे, असे त्यांनी लावलेले ऋचांचे अर्थ बघून वाटते. यांत त्यांना दोष द्यायचा नाही, त्यांची चूक नाही. कारण आध्यात्मिक पंडितांना, प्रज्ञावानांना आधुनिक विज्ञानाचा गंध नसल्याने, समजत नाही, तर आधुनिक वैज्ञानिक शास्त्रज्ञांना अध्यात्म व संस्कृत भाषेचा गंध नसतो, आणि वेद जाणून घ्यायची त्यंाची इच्छाही नसते. यावरून एक गोष्ट तरी निश्चित आहेत की, आधुनिक शास्त्रांच्या चष्म्यातून सर्व वेदांचा अर्थ पुन: एकदा लावणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी खटाटोप करणेहि अत्यंत जरूरीचे आहे.

वैदिक आणि अर्वाचीन ज्योति:शास्त्र हे एक भाग्यवान खगोल विज्ञान आहे. त्याला साजशृंगाराची गरज नाही. फक्त भाषा साधी, सोपी व ओघवती हवी. या शास्त्राने लावलेले शोधच इतके चित्ताकर्षक आहेत की त्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी वेगळे सायास करणेची गरज नाही. या पुस्तकातील लेखांची मांडणी कोणत्याही खगोल शास्त्रीय पुस्तकाहून मूलत: वेगळी आहे. ज्योर्ति:विषयक परिचयाच्या घटनाच अनपेक्षित वळण देऊन मांडल्या आहेत, हेतू इतकाच की कल्पनाशक्तीला चालना मिळावी व वाचकांचे कुतूहल जागृत व्हावे. अणूतून अनंताकडे या माझ्या पुस्तकाच्या अनेक वाचकांनी ग्रहांच्याबाबतही पुढील पुस्तकांत मी लिहावें असा आग्रह पत्राद्वारे मला केला आहे. वास्तविक ग्रह ता यांबाबत ढोबळ माहिती खगोलविषयक कुठल्याहि पुस्तकांत असतेच, शिवाय वर्तमानपत्रातूनहि यावर वारंवार लेख लिहिणारे बरेच आहेत. तीच माहिती पुन: न देता ज्या बाबींचा बहुसंख्य खगोलविषयक पुस्तकांत सहसा विचार केला जात नाही, अशा बाबींवरच मी लक्ष केंन्द्रीत करून त्यावर या पुस्तकांत उहापोह केला आहे. अर्थात ज्योती:शास्त्राच्या समृध्द आशयांची मिमांसा करण्याचा प्रयत्न येथे केलेला नाही, हे इथे आवर्जून सांगायचे आहे.

आज अध्यात्म व आधुनिक विज्ञान यातील परस्पर संबंध आणि अतूट नात्यास हळू हळू जगन्मान्यता मिळत आहे. प्रसिध्द शास्त्रज्ञ आइनस्टाइनने म्हटलेच आहे की आध्यात्मशिवाय विज्ञान पांगळे आहे व विज्ञानाशिवाय आध्यात्म आंधळे आहे. इतकेच नव्हे तर प्रगत अणूविज्ञान आध्यात्मशास्त्रज्ञाकडेच झेपावत आहे. भारतीय तत्वज्ञान्यांनी आध्यात्मांत वेळोवेळी प्रकट केलेल्या खगोलशास्त्रीय ज्ञानाचा आधुनिक वैज्ञानिक सिध्दांताशी मेळ घालण्याचा प्रयत्न या पुस्तकांत केला आहे. निष्कर्षाचे पुष्ट्यर्थ जरूर तेथे संदर्भ, श्लोक, ऋचा उदघृत केल्या आहेत. त्यासाठी खालील संदर्भग्रंथांचा मला फार उपयोग झाला हे आवर्जून सांगायचे आहे.

संदर्भ-ग्रंथ :-
१) ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, ज्ञानेश्वरी चांददेव पासष्टी, दासबोध.
२) ऋग्वेदांचे मराठी भाषांतर म.म. सिध्देश्वरशास्त्री चित्राव
३) दीर्घतमस् आणि सूर्य - कै. मा.भ. पंत (भैरयासाहेब पंत)
४) उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण भाग १ व २ आणि
`वास्तव रामायण डॉ. पं. वि. वर्तक
५) `विश्व व सृष्टी विज्ञान भाग ३ व ४ श्री.प्र.वा.गोखले, पुणे.
६) `वेदातील विज्ञान डॉ. धनंजय देशपांडे, मुंबई
७) `प्रकाशाची अक्षरे - चांगदेव पासष्ठी व नवविज्ञान
श्री. प्रभाकर अडसुळे आणि श्री. व. दि. कुलकर्णी
८) `मनोरंजक ज्योर्तिशास्त्र - लेखक पेरेलमन,
अनुवादक - प्र. पां. संझगिरी
९) `आकाशदर्शन अॅटलास श्री. गो. रा. परांजपे
१०) श्री चांगदेव पासष्टी व विज्ञानानुभव - लेखक डॉ. मधुकर आष्टीकर

वर नमूद केलेल्यापैकी काही ग्रंथात ग्रंथकर्त्यांनी खगोल विज्ञानाशी संबंधीत असे काही मुद्दे त्रोटकपणे आध्यात्मिक वा उपनिषदांचे निरूपण करतांना, वा संबंधित विषयाचे स्पष्टीकरण करतांना, त्यांचे पुष्टयर्थ मांडले आहेत. त्याचा मला उपयोग झाला आहे हे मला कृतज्ञतापूर्वक सांगायचे आहे. खगोल शास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांत आवश्यक त्या सुधारणा करून तो मुद्दा मी या पुस्तकांस समाविष्ट केला आहे व तसा संदर्भ लगेच खाली दिला आहे.
जमीन, ग्रह, तारका, दिर्घिका, विश्व-ब्रह्मांड आदि सृष्टी, ब्रह्म तसेच परब्रह्म ही मंडळी जशी माझ्या मनाच्या कपाटांत आपापल्या योग्य जागी व्यवस्थितपणे बसली आहेत, तशीच वाचकांच्या मनातही ती बसावीत असा, हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे. तो सफल व्हावा हीच प्रार्थना !
स्पष्टच सांगावयाचे झाले तर या पुस्तकांत सत् व नित्य अध्यात्मधर्माचा मी पुनरूच्चार केलेला आहे. त्यामुळे तो आवडण्या-नावडण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीं. हा अस्तिक्य धर्म आहे. तो लुप्त झाला होता, म्हणून मी तो पुन्हा सांगितला आहे. उत्पन्न झालेला किंवा उत्पन्न केलेला नाहीं, स्वयंभू आहे, त्यामुळे तो मानव निर्मित नाही. हे पुस्तक हा एक दस्तऐवज आहे, कोणी वाचो अथवा न वाचो. ज्याचे नियतीत हे पुस्तक वाचणे असेल तो वाचेल. माझ्याजवळ जे होते ते मी पुढीलांचे स्वाधीन केले आहे.

बाळकृष्ण शंकर जोशी - ‘आभाळमाया’ व ‘अणूतून अनन्ताकडे’ या पुस्तकांचे लेखक

Hits: 62