वेदांकडे पाहाण्याची पाश्चात्य विद्वानांची दृष्टी
इ.स. १८७८ मध्ये ब्रिटीश लेखक एडवर्ड गॉगने भारतीय तत्वज्ञानाबाबत कलकत्ता रिव्हयू या मासिकांत आपले विचार प्रसिध्द केले आहेत. त्याचा मतितार्थ असा -
१) भारतीयांच्या भाषेपेक्षा व सर्वसाधारण बौध्दिक पातळीपेक्षां युरोपीय विचारसरणी ही उच्च दर्जाची आहे.
२) भारतीय वेद आणि तत्वज्ञान हे अप्रगत, जंगली व कलाहीन असून खालच्या दर्जाच्या, निम्नकोटीच्या कल्पना शब्दांत मांडण्याचा तो प्रयत्न आहे.
३) निसर्गाच्या तत्वांत, जसे-सूर्य अग्नी, पाऊस वीज यांत देव पाहणे हा बालिश बुध्दीचा परिणाम आहे.
४) जगाला देण्यालायक फार उच्च असे वैचारिक, बौध्दिक धन भारतापाशी मुळीच नाही.
एडवर्ड गॉगने जेव्हा वरील विचार मांडले तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. ब्रिटिश जेते, राज्यकर्ते होते. त्यामुळे जीत ही जेत्यापेक्षा, प्रजा ही राजापेक्षा, राजाच्या ज्ञानापुढे कधीच श्रेष्ठ असू शकत नाही, हा गंड ब्रिटिश विचारकांमध्ये होता. मॅक्समुल्लर या जर्मनीतील देश्योश् गावात जन्मलेला पंडित सुध्दा एडवर्ड गॉग हया लेखकाप्रमाणे भारतीय संस्कृती आणि ऋग्वेदाबाबत दुषित नजरेने बाधित होता. तथापि इ.स. १८४४ ते १८९२ काळात त्याने ऋग्वेदाचे सखोल अध्ययन केल्यानंतर त्याचे विचारांत आमुलाग्र बदल होऊन तो ऋग्वेदाने आणि पर्यायाने भारतीय संस्कृतीने भारावलेला होता असे दिसून येते, त्यामुळे त्याचे सगळे विविध विचार मुख्यत: वेदातील विषयांवर आहेत हे त्याच्या नंतरच्या ग्रंथावरून देखील आढळून येते.